पुणे : दत्तवाडीत अज्ञात रिक्षाचालकाने मुलीची छेड काढून विनयभंग केला होता. दरम्यान त्याच्याविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर फरार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या रेखाचित्रावरून शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी दत्तवाडी तपास पथकांच्या वेगवेगळया टिम करुन दाखल गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. तपासा दरम्यान पोलीसांनी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट चे प्रा.गिरीश चरवड यांच्या मदतीने आरोपीचे संभाव्य रेखाचित्र तयार करुन घेतले. तसेच कोथरुड ते दत्तवाडी पर्यंतच्या सुमारे १०० सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केली.
त्यादरम्यान पोलिसांना एका रिक्षाचे अंधुक चित्रण तसेच अर्धवट आर.टी.ओ. नबंर मिळाला. त्यादरम्यानच पोलिसांना गोपनिओय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, रेखाचित्रातील चेहऱ्यात साम्य असणारा रिक्षाचालक हा सध्या पर्वती टेकडीच्या खालील पायऱ्यांजवळ त्याच्या रिक्षासह थांबला आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी ताबडतोब सापळा रचून सदर रिक्षाचालकास ताब्यात घेतले.
आरोपीचा कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. अरविंद वामन घोलप (वय- ६० वर्षे, रा. पर्वती) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उप - निरीक्षक स्वप्नील लोहार आणि त्यांच्या पथकाने केली आहे .