पिंपरी : मोरवाडीतील श्रद्धा हेरिटेज या इमारतीमध्ये गेल्या तीन दिवसांत सात घरफोड्या झाल्या आहेत. उन्हाळी सुटीत नागरिक सहकुटुंब गावी गेले आहेत. कोणी विवाह समारंभांसाठी बाहेरगावी नातेवाइकांकडे, तर कोणी पर्यटनासाठी गेले आहेत. त्यामुळे सदनिका बंद आहेत. सलग दोन ते तीन दिवस सदनिका बंद असलेल्या ठिकाणी चोरटे पाळत ठेवून चोऱ्या करू लागले आहेत. त्यामुळे रहिवाशांना आता सदनिका बंद ठेवून बाहेरगावी जाणे असुरक्षित ठरू लागले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी श्रद्धा हेरिटेज या इमारतीतील चौधरी कुटुंबीय लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेलेले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून आवाज येऊ लागला. संशय आल्याने शेजाऱ्यांनी उठून दरवाजाला असलेल्या होलमधून आत पाहिले. रुमालाने तोंड झाकलेले दोन इसम दरवाजाची कडी उचकटण्याचा प्रयत्न करताना त्यांना दिसले. संशय बळावल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्वरित पोलीस आले. परंतु, तत्पूर्वीच चोरटे पसार झाले होते.पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच चोरटे मोटारीतून पसार झाले. त्यानंतर सर्व रहिवाशांनी घराबाहेर येऊन पाहणी केली असता, दुसऱ्या मजल्यावरील रानडे यांच्या सदनिकेचा दरवाजा उचकटलेला दिसून आला. त्यांच्या घरातील सात हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. एकाने चाकूचा धाक दाखवून सुरक्षारक्षकाचे डोळे व तोंड बांधले. उर्वरित दोघे पाळत ठेवण्यासाठी थांबले. दोघे चोरीच्या उद्देशाने इमारतीत गेले. असे त्या रखवालदाराचे म्हणणे आहे. असाच प्रकार मंगळवारी या इमारतीच्या शेजारील इमारतीत घडला होता. चिंचवडगावात दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटनासुद्धा याच कालावधीत घडली आहे. सोळंकी कुटुंबीय राजस्थानला मूळ गावी गेले होते. त्याचा चोरट्यांनी गैरफायदा उठवला. शहरातील ५० ते १०० सदनिका असलेल्या गृहसंस्थांमध्येही सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. (प्रतिनिधी)
चोरटे शोधताहेत सावज
By admin | Published: May 09, 2015 3:17 AM