लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : श्रीक्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध अशा कोंढवळ येथील धबधब्यात पडून शिक्रापूर येथून आलेला लक्ष्मण सोन्याबापू लहारे (वय २९) हा तरुण बेपत्ता झाला होता. ३६ तास होऊनदेखील अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत.
शुक्रवारी (दि. १८) भीमाशंकर परिसरात सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने कोंढवळ धबधब्याच्या पाण्यात वाढ झाली आहे.
लक्ष्मण लाहारे हा त्यांच्या मित्रांसोबत कोंढवळ येथील धबधबा पाहण्यासाठी गुरुवारी (दि. १७) आला होता. या वेळी त्याचा पाय घसरून तो धबधब्यात कोसळून बेपत्ता झाला होता. स्थानिक ग्रामस्थ व पोलीस त्याचा शोध कालपासून घेत आहे. मात्र, त्याचा शोध लागला नाही. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, सहायक पोलीस फौजदार जिजाराम वाजे, पोलिस काॅ. शरद कुलवडे, वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, वन कर्मचारी एन. एच. गिरे, एस. एस. लवंगे, जी. एम. गोरे व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लाहारे याचा शोध लागला नाही. शनिवारी (दि. १९) सकाळी एनडीआरएफचे पथक शोधकार्य करण्यासाठी येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले.
भीमाशंकर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाहाचा वेगही वाढला आहे. यामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे. एनडीआरएफचे पथक आल्यावर शोधकार्याला वेग येणार आहे.
फोटो : कोंढवळ येथील धबधब्यावर मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.