पुणे : सायंकाळी अंधार पडल्यावर मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, सभामंडपात एक तरुण जीवंत सापडल्यानंतर रात्रीही मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून सर्चलाईट मागविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. रात्री उशिरा हे सर्चलाईट घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी राव यांच्यासोबत पोलीस अधीक्षक मनोज लोहिया आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. अडिवरे गावात बुब्रा नदीकाठी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मृतदेह अडिवरे येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत. माळीण गावातील एक शिक्षक मच्छिंद्र झांजरे, पत्नी, दोन मुले आणि आई- वडीलांसह येथे राहतात. आज सकाळी पदवीधर आॅनलाईनची परीक्षा असल्याने ते सकाळी आठ वाजता गावाबाहेर पडले होते. बोरघर येथे पोहोचल्यावर त्यांना घटनेची माहिती समजली. ते गावात गेले. परंतु, घरातील सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने बेपत्ता आढळले. रेशनकार्डवर नावे शोधताना सापडले मृतदेहही.. मदतकार्य करत असलेल्या भीमा गवारी यांना एका घरात रेशनकार्ड सापडले. त्यावरील नावे पाहत असतानाच खोदाई करत असताना नावे असलेले सर्व सहाच्या सहा मृतदेह सापडले. या प्रलयामध्ये घरामधील कोणीही वाचले नव्हते. यामध्ये पाच प्रौढ आणि एक बालिकेचा समावेश आहे.मदतपथकाला सापडलेल्या मृतदेहांची अवस्था पाहून त्यांना क्षणाचीही उसंत मिळाली नाही, हे स्पष्ट झाले. एक महिला बाळाला कुशीत घेऊन झोपलेल्या अवस्थेतच सापडली. तर एक महिलेचा मृतदेह आंघोळीच्या कपड्यावरच सापडला. डिंभे धरणाच्या पाण्याच्या दबावामुळे या परिसरातील डोंगरावर भेगा पडल्या आहेत. काही वर्षांपासून माळीण गावाजवळच्या डोंगराला भेग पडलेली आहे. काही किलोमीटर लांब असलेल्या या भेगेत वर्षानुवर्षे पाणी साठत आहे. त्यामुळेच डोंगर खचला असण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पांचाळे, कुशिरे, बेंडारवाडी, मेघोली गावाच्या वरच्या बाजुला असलेल्या डोंगरालाही अशाप्रकारची भेग असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)
पुणे, पिंंपरीतून सर्चलाईट मदतकार्य
By admin | Published: July 31, 2014 2:34 AM