मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : येथील रेल्वे विभागातील सांडपाणी व तुडुंब भरलेल्या गटारींचा उपद्रव नगर परिषद हद्दीतील रहिवाशांना होत आहे. रेल्वे स्थानकातून गटारींद्वारे शहरात येणारे हे पाणी थेट रस्त्यावरच येत आहे. यामुळे रस्ते तर नादुरुस्त होत आहेत, शिवाय दूषित आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. रेल्वे कुरकुंभ मोरीत बाराही महिने सांडपाण्याचा संचार असतो. त्यामुळे मोरीतून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना सांडपाण्यातून जावे लागते. परिणामी या सांडपाण्यामुळे मोरीत दुर्गंधी पसरते. एखादे वाहन वेगात आल्यास हे सांडपाणी थेट पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादविवाद वाढले आहेत. कुरकुंभ मोरीत येणारे सांडपाणी हे रेल्वे हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांचे आहे. याचबरोबर शहरातून एक मोठी गटार गेलेली आहे. या गटारातील सांडपाणी आणि घाण रेल्वे विभागातील आहे. हे गटर शहरातून जात असल्याने गटारीच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे, असा भ्रम रेल्वे खात्याचा झालेला आहे. नियमाने ही साफसफाई रेल्वे खात्याने करणे बंधनकारक आहे, या मतावर नगर परिषद ठाम आहे. या वादात गटारे मात्र तुंबली असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. कुरकुंभ मोरीत सातत्याने सांडपाणी साचले जाते. नागरिकांना याचा त्रास होत असल्याने काही वेळेला नगर परिषदेने या मोरीची सफाई केली आहे, मात्र ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. सणावाराला मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वे कुरकुंभ मोरीतील साफसफाई नगर परिषदेने केली आहे. काही झाले तर नगर परिषद साफसफाई करून घेते. हा समज रेल्वे खात्याचा झाल्याने कुरकुंभ मोरी आणि शहरातून गेलेल्या मोठ्या गटारी पूर्ण तुंबल्या आहेत. परिणामी संगम कॉलनी, नेने चाळ, खाटिक गल्ली, भीमथडी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांसह अन्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे ज्युनिअर लायब्ररी आणि नेनेचाळ यांच्या मधोमध रेल्वेचे उद्यान आहे. या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. यातील खेळणी कुजलेली आहेत. परिसरात साचलेल्या घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे नागरिक या ठिकाणी येण्याचे टाळत आहेत. या घाणीच्या साम्राज्यातून पाणीपुरवठा करणारे छोटे पाईप आहेत. यातील एका पाईपाला गळती लागल्यामुळे रस्त्यावरच पाण्याचे डबके झालेले आहे. ज्या ठिकाणी डबके झाले तेथे घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. याचा उपद्रव मात्र शहरातील नागरिकांना होत आहे. तेव्हा शहरी विभागातून जाणारी गटारे आणि रेल्वे कुरकुंभ मोरीची स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वीकारावी तसेच रेल्वेच्या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे ती थांबवणे गरजेचे आहे.
दौंड रेल्वेचे सांडपाणी रस्त्यावर
By admin | Published: May 13, 2017 4:19 AM