भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच : सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:00 PM2023-10-20T20:00:22+5:302023-10-20T20:01:09+5:30
कालवा सल्लागार समितीपूर्वी तटकरे यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली...
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच होईल. त्यासंदर्भात आमची बैठक होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
कालवा सल्लागार समितीपूर्वी तटकरे यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी वेळापत्रक ठरविण्यासाठी पवार यांना भेटल्याचे ते म्हणाले. त्यावेळी जागावाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘जागावाटपात फार घासाघिस होईल, असे वाटत नाही. आमची बऱ्यापैकी तयारी आहे. एकत्रित बसून प्रश्न सोडविला जाईल.’ रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सध्या महायुतीत वाद आहेत त्याबाबत ते म्हणाले, ‘आघाडी सरकार तयार होते तेव्हा असे प्रश्न उद्भवतात. राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यावेळी सगळे प्रश्न सुटतील. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार जे निर्णय घेतील, ते सर्व मंत्र्यांना मान्य असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वेळ आल्यावर ठरवू
सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारता, ‘प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारी करीत असतो. मात्र, आम्ही ज्या त्या वेळी त्याचा विचार करू असे सांगून अजित पवार यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास टाळले.
‘महायुतीत ज्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत, त्या त्या जागा त्या पक्षाला द्यायच्या. पण काही जागांबाबत सध्या बोलणी सुरू होईल. शिरूर लोकसभेच्या जागेवर आम्ही दावा करणार आहोत. पण त्या ठिकाणी कोणाला उभे करायचे हे पक्ष ठरवेल.” तर जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये मात्र, यावरून महायुतीचा सगळा वेळ चर्चेत चालला आहे. मी लोकसभा लढणार नाही. कर्जत जामखेडमधूनच विधानसभा लढणार आहे. मला कर्जत जामखेडच्या लोकांनी खूप प्रेम दिले आहे.”
- दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री