लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : श्वेत कृष्ण आभाळाला साक्षी ठेवत आज (दि. २७) दुपारी बारा ते एक वाजण्याच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या मैदानात संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पांढऱ्या ढगांमध्ये काळ्या ढगांची झालेली पेरणी, हवेत बराचसा उष्मा, सभोवार भाविकांची गर्दी आणि भुईवरच्या लाल मातीत खुरांचे दमदार ठसे उमटवत वाऱ्याच्या वेगाने दौडणारे दोन कृष्णरंगी अश्व, सभोवती फडफडणाऱ्या बंगल्या पताका... ग्यानबा-तुकारामाचा अखंडित उद्घोष, साथीला टाळ-चिपळ्या व मृदंगाची धून मेंदूत भिनणारी, आतल्या भक्तिभावाला साद घालणारी लय.... अशा मंतरलेल्या वातावरणात हे तालुक्यातील दुसरे अश्वरिंगण रंगले.सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्याने प्रथमत: संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या नगारखान्याचे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाले. सव्वाबारा वाजता पालखीचा रथ आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुकुंद शहा, भरतशेठ शहा, श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, नगरसेवक पोपट शिंदे, पांडुरंग शिंदे, शेखर पाटील, भाजपाचे नेते माऊली चवरे आदींनी पालखीचे व पालखीप्रमुखांचे स्वागत केले. त्यानंतर पालखीचा रथ रिंगणातून फिरवण्यात आला. हर्षवर्धन पाटील यांनी रथाचे सारथ्य केले. पूजा झाल्यानंतर प्रत्यक्षात रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम झेंडेकरी, त्यानंतर तुळशीवाल्या महिलांची दौड झाली. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्वरिंगणाचा सोहळा झाला. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात आणण्यात आली. तेथे हर्षवर्धन पाटील, पद्मा भोसले, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा, भरतशेठ शहा यांनी पूजा केली. पालखीच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटल्याचे चित्र दिसत होते.
इंदापुरात रंगले दुसरे अश्वरिंगण
By admin | Published: June 28, 2017 4:01 AM