प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : विषाणूचा हल्ला झाल्यावर शरीराची प्राथमिक रोगप्रतिकारकशक्ती अर्थात इनेट इम्युन सिस्टीम कार्यरत होते. त्यानंतर अधिक सशक्त असलेल्या अँडापटिव्ह इम्युन सिस्टीमधील पेशी अँटिबॉडी विकसित करण्याचे काम करतात. अँडापटिव्ह इम्युन रिस्पॉन्स सक्षम असेल तर विषाणूचा नव्याने संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. मात्र, सध्या कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरियंट तयार होत असल्याने पुन्हा लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्यांदा झालेला संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो, याकडे वैद्यकतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना याआधी १६ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा त्यांना लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे रिइन्फेक्शनची शक्यता किती असते, पुन्हा लागण झाल्यास काय त्रास होतो, याबाबत चर्चा होत आहे. अँटिबॉडीचा प्रकार, पातळी, प्रमाण यांवर रोगप्रतिकारकशक्ती अवलंबून असते, असे विषाणूतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
----
कोरोनाची लागण होऊन गेल्यावर शरीरात किती प्रमाणात अँटिबॉडी तयार होतात आणि किती काळ टिकतात, याबाबत अभ्यास सुरू आहे. विषाणूचे काही व्हेरियंट अँटिबॉडींना फसवतात, म्हणजेच नवीन स्ट्रेनला अँटिबॉडी ओळखू शकत नाहीत. त्यामुळे एकदा कोरोना होऊन गेला म्हणजे आपल्याला १०० टक्के सुरक्षितता मिळाली, असे होत नाही. अँटीबॉडी टेस्टमध्ये प्रमाण समजू शकते. बायंडिंग अँटिबॉडी केवळ विषाणूला चिकटतात आणि न्यूट्रलायझिंग अँटिबॉडीमध्ये विषाणू नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे कोणत्या अँटिबॉडी शरीरात तयार झाल्या आहेत, यावर रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असते.
- डॉ. सुहृद सरदेसाई, कन्सलटिंग फिजिशियन
----
सध्या पुण्यात कोरोना विषाणूचे पाच प्रकारचे व्हेरियंट आहेत. त्यामुळे कोरोनाच्या एका प्रकारचा हल्ला झाल्यावर तयार झालेल्या अँटिबॉडी दुसऱ्या प्रकारच्या विषाणूला कसा प्रतिसाद देतात, याबाबत संशोधन सुरू आहे. मात्र, दुसऱ्यांदा होणारी लागण सौम्य स्वरूपाची असते. लस घेतल्यावर कोरोना होतो, या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. लस घेतल्यावर गंभीर स्वरूपाचा कोरोना होण्याची शक्यता ९५ टक्क्यांनी कमी होते.
- डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन
------
सध्या कोरोनाची लस दंडात दिली जाते. लसीमुळे शरीरात आयजीएम किंवा आयजीजी प्रकारच्या अँटिबॉडी निर्माण होतात. पोलिओची लस तोंडावाटे दिली जाते. त्यातून आयजीए अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी म्युकस मेंबरेनला संरक्षण देतात. त्यामुळे विषाणूपासून सुरुवातीपासूनच संरक्षण मिळते. कोरोनाच्या अँटिबॉडी शरीराच्या इतर भागांत तयार होत असल्याने विषाणू नाकावाटे प्रवेश करतो. घशातून खाली गेल्यावर त्याला प्रतिकार करणारी प्रतिपिंडे तयार होतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो. मात्र, त्याचे स्वरूप गंभीर होत नाही, असेही वैद्यकतज्ज्ञांनी सांगितले.