पुणे : दूध, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळता पुणेकरांनी 'विकेंड लॉकडाऊन'च्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहणेच पसंत केले. औषधांच्या खरेदीसह लसीकरणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तुरळक वाहने रस्त्यावर दिसत होती. पुणेकरांनी पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडवीत दोन दिवसांच्या 'लॉकडाऊन'चे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले.
राज्य शासनाने पूर्ण राज्यात ३० एप्रिलपर्यंत शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या 'लॉकडाऊन' लागू केलेले आहे. त्याची पुण्यातही कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पालिकेने याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर, पोलिसांनीही आदेश काढले. पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी सर्वत्र नाकाबंदी करण्यास सुरुवात केली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी नेमण्यात आलेल्या 'विशेष पोलीस अधिकारी' असलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा मदत घेण्यात आली. प्रमुख चौकांमध्ये हे पोलिसांच्या मदतीने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना जाब विचारला जात होता. तर, कामाचे कारण देणाऱ्यांच्या माहितीची खातरजमा केली जात होती. खासगी कंपन्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या ओळ्खपत्रांची तपासणी केली जात होती.
शहरातील एरवी गजबलेल्या बाजारपेठा दोन दिवसांपासून सुन्यासुन्या होत्या. लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, मंडई परिसरासह उपनगरांमध्येही शुकशुकाट पाहायला मिळाला. रस्त्यावर अगदीच तुरळक वाहने दिसत होती. दोन दिवस लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी आधीच भाज्यांचा साठा घरात करून ठेवलेला होता. परंतु, दैनंदिन आवश्यकता असलेल्या दुधाचा आणि वर्तमानपत्रांचा पुरवठा मात्र सुरळीत होता. त्यामुळे नागरिकांना फारशा अडचणींचा सामना करावा लागला नाही.
येत्या दोन दिवसात राज्य शासन लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने सोमवारी बाजारात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ही गर्दी रोखण्यासाठी नियोजन केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
-----
रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी, स्वॅब तपासणीसाठी काही नागरिक बाहेर पडत होते. यासोबतच औषधे घेण्यासाठी आणि लसीकरणासाठीही नागरिक बाहेर पडले. याव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून समज दिली जात होती. चौकाचौकात पोलिसांकडून विचारपूस होत असल्याने नागरिकही बाहेर पडण्याचे टाळत होते.