तीन गावांतील २ हजार ५५७ व्यक्तींचे लसीकरण
भारतीय जैन संघटनेचा उपक्रम
नीरा : पुरंदर तालुक्यातील मांडकी, वाल्हे व आडाचीवाडी या तीन गावांतील २ हजार ५५७ नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस गेल्या दोन दिवसांत देण्यात आला. त्यामुळे आता या तिन्ही गावांतील प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधित लस दिल्याचे पुरंदरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधीत लसीकरण होणे गरजेचे आहे. शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होताना अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेला मदत व यंत्रणेला सोबत घेत भारतीय जैन संघटना पुणे जिल्ह्यातील काही गावांना कोरोनामुक्त गाव अभियानात सहकार्य करत आहेत.
भारतीय जैन संघटना व पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या मदतीने पुरंदर तालुक्यातील मांडकी, वाल्हे, आडाचीवाडी या तीन गावांमध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या कॅम्पचे आयोजन दि.१५ व १६ या दोन दिवसांत मांडकी येथील ८१९ व्यक्तींना, वाल्हे येथील १,५५४ व्यक्तींना तर आडाचीवाडी येथील १९३ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
मांडकी, वाल्हे, आडाचीवाडी या तीन गावांमध्ये लसीकरण झाले. दोन दिवसांत एकूण २ हजार ५५४ व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे विजय धनवे यांनी दिली. या तिन्ही गावांत प्रत्येकी पाच समित्या स्थापन केल्या होत्या, या समित्यांनी सर्वेक्षण, जनजागृती, ऑनलाईन नोंदणी आदी काम करत जिल्हा आरोग्य विभागाल व जैन संघटनेला सहकार्य केले. या पाच समितीच्या चांगल्या कामामुळे गावातील बाधित संख्या आता शून्य झाली आहे.
मांडकी (ता. पुरंदर) येथे लोकांनी रांगा लावत, कोरोनाचे नियम पाळत कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतला. (छाया : भरत निगडे)