लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेने गुरुवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ दुसरा डोसच देण्याचे आदेश जारी केल्याने आज दिवसभरात आदेश प्राप्त झालेल्या लसीकरण केंद्रांवर बहुतांशी प्रमाणात लसीचा दुसरा डोसच नागरिकांना देण्यात आला. यामध्ये सर्वाधिक दुसरा डोस हा ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला असून, ही संख्या ६ हजार ६४८ इतकी आहे़
गुरुवारपासून (दि़.२९ एप्रिल) शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांना महापालिकेकडून होणारा लस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २८ एप्रिल) महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ हजार डोसपैकी आज दिवसभरात लसीचे १४ हजार ५९० डोस महापालिकेच्या ११४ लसीकरण केंद्राव्दारे नागरिकांना देण्यात आले आहेत. दरम्यान बहुतांशी केंद्रांना महापालिकेचे दुस-या डोससंबंधित आदेश दुपारी कळल्याने व लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या कमी असल्याने उपलब्ध लसीपेक्षाही लसीकरण कमी झाले असण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात १४ हजार ५९० लसीपैकी ४ हजार ५९३ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर ९९, फ्रंटलाईन वर्कर ४९३, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक १ हजार १५७ तर ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या २ हजार ८६४ इतकी आहे़
तर लसीकरणाचा दुसरा डोस हा हेल्थ केअर वर्कर ३३०, फ्रंट लाईन वर्कर ७१७, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ६ हजार ६४८ तर ४५ वर्षांवरील २ हजार ३०२ जणांना देण्यात आला. लसीकरणाच्या आजच्या दिवशी बुधवारपेक्षा ४ हजार ८७७ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
--------------------
चौकट
पाच हजार लसी परत मागून घेतल्या
पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून बुधवारी रात्री ३० हजार लस प्राप्त झाल्या. त्या लस घेऊन गाडी महापालिकेकडे आली. मात्र त्यानंतर पुन्हा शासनाकडील लस पुरवठा करणा-या अधिका-यांने पुणे महापालिकेला ग्रामीणच्या ५ हजार लस आल्या असल्याचे सांगून, तुम्हाला केवळ २५ हजार लस दिल्या आहेत. उर्वरित लस पुन्हा पाठवून द्या, असे सांगितले असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. दरम्यान बुधवारी आलेल्या लसीमध्ये कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोसकरिता साडेपाच हजार डोस आले असून उर्वरित डोस कोविशिल्डचे आहेत. सध्या सुमारे ५ हजार व पूर्वीचे केंद्रांकडील काही डोस विचारात घेता साधारणत: ११ हजार डोस शिल्लक आहेत. तर राज्य शासनाकडून आणखी लसपुरवठा शुक्रवारी (दि. ३० एप्रिल) करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
----------------------------------------