पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाल्याने पुणे शहरात संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात २० दिवस पाऊस पडला आहे. त्याचा परिणाम यंदा ऑक्टोबर महिन्यात पुणे शहरात तब्बल २३५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१० मध्ये सर्वाधिक २६३़.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये पुणे शहरात पडलेला पाऊस हा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला आहे.
यंदा ऑक्टोबरमध्ये ५ ऑक्टोबरला पुणे शहरात एकाच दिवशी ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचप्रमाणे ५ ऑक्टोबर २०१० रोजी एकाच दिवशी तब्बल १८० मिमी पावसाची नोंद झाली होती. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र एकापाठोपाठ एक निर्माण होत गेले. या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र एकावेळी तयार झाल्याने ते एकमेकांना धडकल्याने राज्यात प्रवासाचे प्रमाण अधिक राहिले आहे. तसेच, अरबी समुद्रात ‘क्यार’ व त्यानंतर आता ‘माहा’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम स्वरूप पुणे शहरासह राज्यातील अनेक शहरांत पाऊस होत आहे.
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, माहा चक्रीवादळामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस सर्वदूर हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात कमी वेळेत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र सप्टेंबरअखेरीस अथवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जसा पाऊस झाला, तसा पाऊस होण्याची शक्यता नाही़ ४ नोव्हेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असून, ७ नोव्हेंबरनंतर पाऊस बंद होण्याची शक्यता आहे.