पुणे : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वाध्याय उपक्रमास राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी पुणे यात शेवटून दुसरे आहे. बुलढाणा, सोलापूर आणि जळगाव या तीन जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्वाध्याय सोडवत आहेत. या उपक्रमाच्या १९ व्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ८८८ विद्यार्थ्यांनी, सोलापूर जिल्ह्यांतील ३ लाख ६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी तर जळगाव मधील ३ लाख ४ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी उपक्रमास प्रतिसाद दिला. तर मुंबई, पुणे, पालघर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, औरंगाबाद आणि नाशिक या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी डिजिटल होम असाइन्मेंट योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील १७ लाख ९७ हजार ५१६ विद्यार्थ्यांपैकी ५३ हजार ९८० विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून २७ हजार ८७ विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला असून केवळ २५ हजार ४१ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला आहे.
चौकट
राज्यातील १८.१६ टक्के विद्यार्थी सहभागी
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १ कोटी ९३ लाख ९८ हजार ५४८ विद्यार्थ्यांपैकी ५६ लाख १६ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमासाठी नोंदणी केली. त्यातील ३५ लाख २३ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविण्यास सुरुवात केली असून ३४ लाख २६ हजार १०९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला आहे.राज्यातील केवळ १८.१६ टक्के विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
चौकट
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये याबाबत अनास्था आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही. त्यामुळे या उपक्रमात जिल्ह्यातील सहभागी झालेल्या विद्यार्थीची संख्या कमी असल्याचे दिसून येते.
- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे