पुणे : कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी केलेला दावा मंजूर झाला नसताना महिलेने परस्पर दुसरे लग्न केले असून तिच्या पोलीस असलेल्या भावाने आपल्या मेव्हण्याला हातपाय तोडून पुरून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हर्षद ज्ञानेश्वर काळे (वय ३१, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद आणि सीमा यांचा २ डिसेंबर २०१९ रोजी आळंदी येथे विवाह झाला होता. दोघेही मंगळवार पेठेत एकत्र राहत होते. जून २०२० मध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यावर ते अनेक ठिकाणी फिरायला गेले होते. एके दिवशी अचानक सीमा हिला आईचा फोन आला. त्यानंतर सीमा ही माहेरी निघून गेली. त्यानंतर हर्षद याने अनेकदा नांदायला येण्याची तिला व तिच्या आईवडिलांना विनंती केली. सीमा हिचा भाऊ किरण साबळे याने फिर्यादी यांना फोन करुन शिवीगाळ करीत बऱ्या बोलाने सीमाचा नाद सोड. ती आता तुझ्याकडे नांदायला येणार नाही. तू जर सीमाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर हातपाय तोडून कोठे पुरून टाकेल, हे कोणाला पत्ताही लागणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये सीमा हिने फोन करून परस्पर संमतीने घटस्फोटाची कागदपत्रे तयार केली आहेत. त्यावर सही कर, नाहीतर माझा भाऊ स्वागत सुनील साबळे हा मोठा भाई आहे. हे तुला माहिती आहे, अशी धमकी दिली. २० जानेवारी २०२१ रोजी फिर्यादीला कोर्टात बोलावून विषाची बाटली दाखवत जबरदस्तीने घटस्फोटदस्तावर सही करायला भाग पाडले.
कौटुंबिक न्यायालयाने घटस्फाेटाच्या आदेशाकरिता ६ महिन्यांचा बंधनकारक कालावधीनंतरची तारीख नेमून सल्लागार समक्ष अर्ज पाठविला. त्या वेळी सीमा हिने कशा धमक्या देत बळजबरीने सह्या घेतल्या, हे कोर्टाला तोंडी सांगितले. त्यांनी तसा अर्ज सल्लागारांकडे करण्यास सांगितला. दरम्यान घटस्फोट झाला नसताना व अर्ज प्रलंबित असताना सीमा हिने परस्पर दुसरा विवाह केला. न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.