लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गातील शिवाजीनगर ते कसबा पेठेपर्यंतच्या दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा बोगदा खोदणारे यंत्र (टीबीएम) कसबा पेठेत शनिवारी (दि. ३१) दुपारी पोहोचेल.
स्वारगेटच्या बाजूनेही बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. तेथील दोनपैकी एक बोगदा आता मंडईपर्यंत आलेला आहे. ते काम तिथून पुढे तसेच कसबा पेठेपर्यंत नेण्यात येईल. कसबा पेठेतील टीबीएमचे भाग सुटे करून ते यंत्र स्वारगेटला नेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या तिथून दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू होईल, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.
बोगदा खोदण्याचे काम पुढे जात असतानाच मागील खोदलेल्या बोगद्याला सिमेंट प्लेट बसवल्या जातात. त्यामुळे आता शिवाजीनगरपासून पुढे कसबा पेठेपर्यंत दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याचे गाडगीळ म्हणाले. शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गात शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके आहेत. स्थानकात भुयारी मार्गातील दोन्ही बोगदे एकत्र होतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळे होतील.