पुणे : कुख्यात गजा मारणे आणि निलेश घायवळ टोळीमध्ये टोळीयुद्ध पेटलेले असतानाच मुळशीमध्ये पुन्हा शरद मोहोळ आणि गणेश मारणे टोळीमधील वर्चस्वाच्या लढाईमधून दुसरा खून करण्यात आला. गणेश मारणे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या एका इस्टेट एजंटचा मोहोळ टोळीकडून धारदार हत्यारांनी सपासप वार करुन निर्घृण खून करण्यात आला.एकनाथ बबन कुडले (वय २८, रा. खाटपेवाडी, भुकूम ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील भिलारे, अनिल छगन खाटपे, महेश दत्तात्रय वाघ, स्वप्नील खाटपे, वैभव शेलार, पप्पू उत्तेकर, राम केदारी, हेमंत गोडांबे, शुभम गोळे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडलेचा भाऊ काशिनाथ (वय ३०) याने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुडले हा किशोर मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्या टोळीमध्ये होता. गणेश मारणे टोळीचे आर्थिक व्यवहार सांभाळणा-या किशोर मारणेचा कुडले जवळचा साथीदार होता. पाच वर्षांपुर्वी कुडलेने शेलार आणि अन्य गुंडांच्या मदतीने सराईत गुन्हेगार पिंट्या उर्फ संजय मारणेचा आंबडवेटजवळ खून केला होता. शरद मोहोळ याच्याशी सलग वाढवल्यामुळेच गणेश मारणेने त्याचा खून करवला होता. दिड वर्षांपुर्वी येरवडा कारागृहामधून बाहेर आलेल्या कुडलेने जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. (प्रतिनिधी)
मोहोळ-मारणे टोळीयुद्धात पडला दुसरा खून
By admin | Published: December 01, 2014 11:26 PM