बेल्हा: खोडद येथील जीएमआरटीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रकल्प स्पर्धेत बेल्हा येथील समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आर्मीमधील रोबोट या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला, अशी माहिती प्राचार्य अनील कपिले यांनी दिली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तृतीत वर्षात शिकत असलेल्या मनीष भोर, मानव पटेल, सुमीत विश्वासराव, ऋतुज बोऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार करून सादर केला. जीएमआरटी खोडद येथे डॉ. जे. के. सोळंकी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नव उपक्रमशीलतेला वाव मिळण्यासाठी या प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या वर्षी काेरोनामुळे ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींनी मूल्यमापन केले. समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबोट जमिनीतील बॉम्ब शोधण्यासाठी, फायरिंग करण्यासाठी तसेच डोंगरीभाग, चढ-उतार वळणे अशा विविध ठिकाणी कार्य करण्यासाठी 'आर्मी मॅन' म्हणून अतिशय उपयुक्त असल्याचे प्रकल्प मार्गदर्शक प्रा. नंदकिशोर मुऱ्हेकर यांनी सांगितले.
संगणक विभागातील अक्षित येंध्ये, प्रदीप शेळके, ओंकार भवारी या विद्यार्थ्यांनी लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून बनवलेले "किड्स लर्निंग अप्लिकेशन" या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या प्रकल्पासाठी प्रा. महेश पोखरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प तयार करण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना प्रा. नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा. संजय कंधारे, प्रा. महेंद्र खटाटे, प्रा. राहुल जाधव, प्रा. महेश पोखरकर, प्रा. विशाल कांबळे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. या संकुलातील विद्यार्थी नवनवीन समाजाभिमुख प्रकल्प तयार करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
वायरलेस टेम्परेचर डिटेक्टर फॉर कोविड सेफ्टीला तृतीय क्रमांक
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षांमध्ये शिकत असलेल्या अंकिता टेमगिरे, प्रियांका काकडे, काजल टेमगिरे यांनी कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी वायरलेस टेम्परेचर डिटेक्टर फॉर कोविड सेफ्टी" नावाचा प्रकल्प तयार केला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून घर, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी कोविड रुग्ण प्राथमिक तपासणी करूनच सदर ठिकाणी प्रवेश मिळतो. आपल्या घराबाहेर हा प्रकल्प ठेवल्यास बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे तापमान मोजले जाते ते जर ३७ डिग्रीपेक्षा कमी असेल तरच सेफ्टी दरवाजा उघडला जाईल व पुढे लगेचच त्याला सॅनिटाईज केले जाईल. अन्यथा, जर तापमान अधिक असेल तर दरवाजा बंदच राहतो. या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाल्याची माहिती प्रा.राहुल जाधव यांनी दिली.