पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची सुमारे दोन वर्षांपासून ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या चुकांमुळे विद्यापीठाला परीक्षा घेताना अनेक अडचणी आल्या. विद्यापीठाची बदनामी झाली होती. मात्र, आता विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीमार्फत जून-जुलै महिन्यात द्वितीय सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पूर्वीच झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
प्रथम सत्रात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ऑनलाइन परीक्षांमुळे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. परिणामी द्वितीय सत्राच्या परीक्षासुद्धा सुरळीतपणे पार पडतील, असा विश्वास विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.