पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा येत्या १२ जुलैपासून सुरु होणार असून या परीक्षेसाठी आतापर्यंत सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. मुख्य परिक्षेआधी याही सत्रात ८ ते १० जुलैदरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र व इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी ४ हजार १९५ विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात येणार असून ६० प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. यातील ५० प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण ३० प्रश्न विचारले जाणार असून त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.
-------
ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करू नये, यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर नमुना दाखल काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येईल, यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.
- महेश काकडे, संचालक,
परीक्षा व मूल्यमापन मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
----
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही अर्ज भरता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना १२, १३ व १४ जुलै रोजी परीक्षा अर्ज भरता येतील. त्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येईल, असेही महेश काकडे यांनी सांगितले.
---------
प्रथम सत्र परीक्षेची ठळक आकडेवारी
एकूण अभ्यासक्रम - २८४
एकूण परीक्षार्थीं - ५,७९,९२८
सिद्ध झालेल्या कॉपी केसेस-३५०
पुनर्परिक्षेसाठी अर्ज- २९७१०
तपासणीअंती झालेल्या पुनर्परिक्षा- १४,३१४
------