भीमाशंकर : हर हर महादेवच्या जयघोषात श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये दुस-या श्रावणी सोमवारी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यावर्षी सोमवार प्रमाणेच दररोज गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस, एसटी महामंडळ व देवस्थान यांच्यावर जास्त ताण आला आहे.
राज्यभर पावसाने दडी मारली असली तरी भीमाशंकर मध्ये दिवसभरात अधून - मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच हा भाग दाट धुके पसरलेला आहे. या वातावरणात भाविक तीन ते चार तास रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. देवस्थानने बस स्थानकापर्यंत दर्शनबारी बनवली आहे. तसेच वाहने लावण्यासाठी पाच वाहनतळ बनविण्यात आले असून येथून मिनी बसव्दारे भीमाशंकरकडे यावे लागत आहे. यासाठी एसटी महामंडळाने 16 मिनीबस ठेवल्या आहेत. तसेच शिवाजीनगर, राजगुरूनगर, मंचर, नारायणगांव अशा विविध आगारातून जादा गाडया सोडण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला आहे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या सह दोन पोलिस पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक, दहा पोलिस उपनिरीक्षक, 69 पोलिस कर्मचारी, एक आरसीपी पथक व तीस होमगाड्र नेमण्यात आले आहेत.
प्रत्येक सोमवारी देवस्थानच्या वतीने मंदिरातील गाभारा व सभामंडप फुलांनी सजविण्यात येत आहे. या सोमवारी श्री स्वामी समर्थ व भगवान शंकराची प्रतिकृती फुलांनी साकारण्यात आली होती.