बारामती : शहरात डेंग्यूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूची साथ बारामतीत मोठ्या प्रमाणात आहे. या आठवड्यात दुसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काल रात्री बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयातून उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.सविता सुरेश भिसे (रा. सुहासनगर, आमराई, बारामती) असे या महिलेचे नाव आहे. सविता यांना रविवारी (दि. २ नोव्हेंबर) थंडी-ताप आदी शारीरिक त्रास जाणवत होता. त्यांना उपचारासाठी त्याच दिवशी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. बुधवारी पहाटे त्यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. सविता भिसे यांचा केवळ सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुरुवातीपासून आम्हाला देण्यात आली नाही. अचानक त्यांची प्रकृती अतिगंभीर झाल्यानंतर, ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले, असे सविता यांचे दीर सतीश भिसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सविता याच कु टुंबाच्या प्रमुख आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.दरम्यान, सविता भिसे यांच्या निधनाने बारामती शहरातील डेंग्यूचा दुसरा बळी गेला आहे. चार दिवसांपूर्वीच शहरातील दूध संघ सोसायटी येथील मोहन पवार यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
बारामतीत डेंग्यूचा दुसरा बळी
By admin | Published: November 05, 2014 11:18 PM