लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : पुण्याप्रमाणेच मुळशी तालुक्याही कोरोनाची दुसरी लाट हळूहळू पसरत असून बावधन, भूगाव, भुकूम, सूस, हिंजवडी, बावधन, माण गावात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तर आता दोन दिवसांमध्ये तब्बल १९ कोरोनाबाधित रुग्णदेखील आढळून आल्याने मुळशीकरांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मुळशीतील १३ गावे कोरोनाग्रस्त असून ५१ पेक्षा अधिक जण उपचार घेत आहेत. डिसेंबरपूर्वी मुळशीतील ७१ गावे कोरानाग्रस्त झाली होती. जानेवारीनंतरच्या दुसऱ्या लाटेत १३ गावात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आयटीनगरीतील मारुंजी, माण, हिंजवडीत कोरोना वेगाने पसरत असून २० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास गावे लॉकडाऊन करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
मास्क न वापरल्यास कारवाईचे आदेश सर्व गावांना देण्यात आले आहेत. यानुसार मारूंजी, माण, हिंजवडी, बावधनसह अनेक गावांत शनिवारी ग्रामपंचायतीने थेट कारवाई केली आहे. मास्क न घातल्यास ५०० रुपयांचा दंड हा शनिवारी १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ व दुकानदारांकडून घेण्यात आला.
याबाबत गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना अधिक पसरू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहनही जठार यांनी केले आहे.
मुळशीत आतापर्यंत एकूण ४७९० पेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. दुसऱ्या लाटेत १३ गावातील ५१ रुग्ण कोरोनाबाधित आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ७७६ रूग्ण हिंजवडीत सापडले होते. त्यापाठोपाठ पिरंगुट ५२८ रुग्ण, भूगाव ४४५, माण ३३०, मारूंजी २४८, सूस ३५७, माण ३३०, बावधन २८५ अशी चिंताजनक स्थिती होती. आता पुन्हा याच गावात कोरोनाचा उद्रेक पाहण्यास मिळत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर ती हॉटेल, मंगल कार्यालयातील गर्दीवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मुळशीतील हॉटेल व मंगल कार्यालयांना ५० पेक्षा कमी लोक असतील, नाहीतर कारवाई केली जाईल, असा आदेशही पोलिसांनी दिला आहे. हॉटेल व मंगल कार्यालय मालकांच्या बैठका घेऊन त्यांना कोरोनाबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास सांगितले आहे.
- मुळशी तालुक्यामध्ये मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून पाचशे रुपयाचा दंड वसूल करतेप्रसंगी