निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट घातक ठरली आहे. या लाटेत ३१ ते ४० वयोगटातील तरुणांना सर्वाधिक लागण झाली, तर ६१ ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू झाले. बाधितांच्या दराबरोबर मृत्यूदरही दुसऱ्या लाटेत सर्वाधिक राहिला. शहरात या लाटेचा वेग कमी होत असला, तरी ग्रामीण भागात अद्यापही वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे.
जिल्ह्यात ९ एप्रिल २०२० ला पहिला कोरोनाबाधिता आढळला. या नंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ही पहिली लाट जानेवारी २१ पर्यंत चालली. नोव्हेंबरनंतर रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये बऱ्यापैकी आटोक्यात होती. वर्षभर वाढत्या रुग्णसंख्येमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. मार्च २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. तीन महिन्यांतच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. या लाटेत ऑक्सिजन आणि खाटांच्या कमतरतेमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला.
पहिल्या लाटेपेक्षा तरुणांना दुसऱ्या लाटेने सर्वाधिक ग्रासले. ३१ ते ४० वयोगटातील लागण होण्याचा दर हा २४ टक्के होता. दुसऱ्या लाटेत त्यात वाढ होऊन तो २६ टक्क्यांवर पोहोचला. रुग्णबाधित होण्याचा दराचा आलेखही हा वाढताच राहिला. पहिल्या लाटेत १९.४, तर दुसऱ्या लाटेत हा दर २३.६ टक्के होता. क्रियाशील रुग्णांची संख्याही दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा घातक ठरली.
चौकट
‘हॉटस्पाॅट’ क्षेत्रही वाढले
जिल्ह्यात पहिल्या लाटेत अनेक गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरच थांबवले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत मोठ्या गावांसोबतच अनेक वाड्या-वस्त्यांवरही कोरोनाबाधित आढळू लागले. पहिल्या लाटेत २०५ हॉटस्पॉट जिल्ह्यात होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या तब्बल ३९७ पर्यंत जाऊन पोहोचली.
चौकट
आरोग्य सुविधांमध्ये वाढ
पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था सुधारण्यात आली. ऑक्सिजन खाटांची कमतरता कमी करण्यासाठी त्यात वाढ करण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी ९७ कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. यात ५७ हजार ४२६ खाटांची क्षमता वाढवण्यात आली. तसेच समर्पित कोविड सेंटर आणि समर्पित कोविड रुग्णालयातही वाढ करण्यात आली.
चौकट
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तपशील
तपशील पहिली लाट दुसरी लाट
एकूण नमुना तपासणी १६,३११२९ २४,७९,५६९
आरटीपीसीआर ११,६०८४९ १४,१४,८०३
अँटिजन ४,७०२३५ १०,३४,७६६
बाधितांचा दर १९.४ टक्के २३.६ टक्के
नमुना तपासणी चाचणी संख्या प्रतिदशलक्ष १४३०८१ २१७५०६
आठवडा वाढ दर २.०४ टक्के ५.४ टक्के
कोरोनाबाधित रुग्णसंख्या १,१३,७१७ २,८९,८५४
अधिकतम आढळलेली रुग्णसंख्या ४,९३५ १२८३६
३१ ते ४०वयोगटातील रुग्ण २४ टक्के २६ टक्के
संपर्क शोध तपशील १२.७ टक्के १६.२ टक्के
एकुण मृत्यू ८८१८ ६,४८८
मृत्यूदर २.४ १.५
चौकट
रुग्णालय व्यवस्थापन
पहिली लाट दुसरी लाट
एकूण कोविड केअर सेंटर १०६ ९७
एकूण खाटा २१०८८ ५७४२६
समर्पित कोविड केअर रुग्णालय १८२ ५८१
एकूण खाटा ६३४१ १५६८६
समर्पित कोविड रुग्णालय ६६ १२०
एकूण खाटा ८१०६ ९१७८
ऑक्सिज खाटा ५६०० १६७९९
एकूण व्हेंटिलेटर ९०४ १८१५