पिंपरी : अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी तसेच गुढीपाडवा अशा मुहूर्तावर वाहन खरेदीला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र कोरोनाची लाट आल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वाहन खरेदी विक्री बंद आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीचा योग ग्राहकांना साधता आलेला नाही.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने तसेच कार्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन विक्रीची दुकाने देखील बंद आहेत. तसेच वाहनांची नोंदणी करून घेण्यासंदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निर्देश आरटीओला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आरटीओकडून नवीन वाहनांची नोंदणीही बंद आहे. परिणामी वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना त्यातही हौशी ग्राहकांना सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याला वाहन खरेदीचा मुहूर्त साधता आलेला नाही.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २०१८ मध्ये तीन हजार ९५० वाहनांची नोंदणी झाली होती. २०१९ मध्ये देखील त्याप्रमाणेच नोंदणी करण्यात आली होती. मात्र २०२० मध्ये नोंदणी झाली नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी -विक्री बंद असल्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉकमध्ये वाहन नोंदणी पूर्ववत सुरू झाली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्याने आरटीओमध्ये ५० टक्के मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन नोंदणी करून घेण्यासंदर्भात शासन निर्देश प्राप्त झाला नाही. काही ग्राहकांनी वाहनांची अगाऊ नोंदणी करून घेतली. त्यामुळे त्यांना मुहूर्त साधता आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घालून दिलेले आहेत. त्यानुसार 'आरटीओ'चे कामकाज सुरू आहे. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड