जेजुरी: पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक कोरोना लसीकरणापासून वंचित ठेवले जात आहे, अशी सापत्न भावाची वागणूक का? असा संतप्त सवाल करीत शासनाने व आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना त्वरित लसीकरण करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार सागर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी केली आहे.
शासनाकडून फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्राथमिक शिक्षक आदी कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम कोविड १९ प्रतिबंधक लस म्हणून कोवॅक्सिन, कोविशिल्डचे लसीकरणास सुरुवात केली आहे. आता तर ५५ वर्षांपुढील नागरिकांनाही लसीकरण केले जाणार आहे मात्र इतरांप्रमाणेच फ्रंट वर्कर म्हणूनच काम करणाऱ्या माध्यमिक शिक्षकांना आजही लसीकरणापासून वंचित ठेवले गेले आहे. शासनाचा अथवा आरोग्य विभागाचा हा दुजाभाव निषेधार्ह आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होता त्या वेळी याच माध्यमिक शिक्षकांना कुटुंब सर्वेक्षण, चेक पोस्ट नाक्यावर तपासणी, रेशनिंग दारूच्या दुकानांवर काम करायला लावले. याव्यतिरिक्त कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे राबवून घेण्यात आले. मात्र यांना लसीकरणास मात्र दूर ठेवले गेले आहे.
येत्या २३ एप्रिलला १२ वीच्या आणि २९ एप्रिलला १० वीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत. मात्र शासनाचे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे १७०० पेक्षा जास्त माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयांतून २५ हजार ५०० पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी काम करीत आहेत. शासनाने त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून शिक्षकांकडे दुर्लक्ष न करता अग्रक्रमाने त्यांना कोविडचे लसीकरण केले पाहिजे.
पुरंदर तालुक्यात एकूण ६५ माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयांतून सुमारे १२०० कर्मचारी आहेत. त्यांनाही लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. माध्यमिक शिक्षकांना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असताना ही टोलवाटोलवी योग्य नसून त्वरित कार्यवाही होणे गरजेचे असल्याचेही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पुरंदरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आमच्याकडे कोणत्याच मार्गदर्शक सूचना नाहीत. मात्र याबाबत आपण शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून योग्य ती कार्यवाही करू असे म्हटले आहे.