जेजुरी : पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रातून माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे.
माध्यमिक शिक्षकांच्या लसीकरणाचा प्रश्न ‘लोकमत’ने मांडला होता. लोकमतच्या वृत्तामुळे शासकीय पातळीवरून माध्यमिक शिक्षकांना लसीकरण सुरू करण्यात आल्याचे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी सांगितले. शिक्षकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात आधार कार्ड झेरॉक्स सोबत घेऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.
‘लोकमत’ने ६ मार्च रोजीच्या अंकात माध्यमिक शिक्षक कोरोना लसीकरणापासून वंचित या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी,प्राथमिक शिक्षक आदींच्या बरोबर माध्यमिक शिक्षकांनाही फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून राबवून घेण्यात आले होते. तरीही शिक्षकांना हे लसीकरण देण्यात येत नव्हते. हा दुजाभाव असल्याचा आरोपही काही शिक्षक संघटनांनी केला होता. या वृत्ताची शासकीय पातळीवरून दखल घेतली गेली आहे.
८ मार्चपासून परिंचे येथील आरोग्य केंद्रात यादववाडी, मांढर, हरणी, पांगारे, काळदरी या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण देण्यात आले. काल ५० शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे १७०० पेक्षा जास्त माध्यमिक विद्यालये आहेत. २५५०० पेक्षा कर्मचारी आहेत. या सर्वांना आता लसीकरण मिळणार असल्याचे शिक्षक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार सागर आणि माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी सांगितले.
फोटो :
लसीकरणानंतर माध्यमिक शिक्षक