लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील सहदुय्यम निबंधक ए. के. नंदकर शासनाचा ऑनलाईल दस्त नोंदणीचा गुपित कोड कार्यालयातील खाजगी व्यक्तींकडे देऊन बाहेर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच ७६ पेक्षा अधिक दस्त स्कॅनिंगच्या नावाखाली प्रलंबित असल्याचे देखील तपासणीत समोर आले. यामुळेच राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी नंदकर यांना निलंबित केले.
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील बोगसगिरी आता समोर येऊ लागली असून, नवनियुक्त नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांची झाडाझडती सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीर गुंठेवारीचे दस्त केल्या प्रकरणी भोसरीच्या
एका दुय्यम निबंधकाला देखील निलंबित केले. येरवडा येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाला तपासणी पथकाने अचानक भेट दिली असता नंदकर सकाळी ११ वाजेपर्यंत कार्यालयात आले नव्हते. तथापी कार्यालयात ऑपरेटर परमेश्वर श्यामसुंदर गाडले व लक्ष्मी नितीन देवरे तसेच खाजगी व्यक्ती गणेश अहिरे, श्रीमती करंजीकर कार्यालयात उपस्थित होते. संगणकावर दस्तऐवज नोंदणी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी हा श्रीमती करंजीकर या महिलेच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आला होता. ही महिला शासकीय कर्मचारी नसताना तिच्याकडे ओटीपी देण्यात आला. या शिवाय नोंदणी झालेला मूळ दस्तऐवज पक्षकारांना ३० मिनिटात परत करणे आवश्यक असताना कार्यालयात स्कॅनिंग होण्यासाठी ७६ दस्तऐवज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. यामुळेच सहदुय्यम निबंधक नंदकर यांना निलंबित करण्यात आले.