पुणे : एकीकडे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला असताना पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाची गुप्त बैठक संपन्न झाली. या बैठकीमुळे आघाडी आणि युतीमधील नेत्यांवर मात्र संबंधित पक्षांना जागा सोडण्यासाठी दबाव वाढणार आहे, मात्र प्रत्यक्ष बैठकीत स्वतंत्र किंवा एकत्र लढण्याविषयी राजकीय चर्चा झालीच नसल्याचे सांगत दोन्ही नेत्यांनी संदिग्धता कायम ठेवली आहे. बैठकीला स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यासह राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यावरही जागा वाटपाचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. थेट एकमेकांसमोर उभे असणाऱ्या युती आणि आघाडीनेसुद्धा अदयाप सोबतच्या छोट्या पक्षांकरीता जागा सोडलेल्या नाहीत. त्यामुळे या पक्षांनी आता बाहेर चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. याचीही सुरुवात म्हणून पुण्यात आज ही बैठक पार पडली आहे. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर जानकर म्हणाले की, आमची मैत्रीपूर्ण बैठक होती. मी राजीनामा देऊन आघाडीत येण्याच्या चर्चा पूर्ण खोट्या आहेत. रासपने मागितलेल्या परभणी, माढा किंवा बारामतीपैकी एक जागा आम्हाला मिळावी अशीच आमची मागणी आहे. मात्र आज झालेल्या बैठकीत अशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे शेट्टी यांनी मात्र बैठकीच्या मागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सुरुवातीला आम्ही आघाडीकडे १५ जागांची आमची तयारी होती. ते शक्य होईल असे वाटत नाही. जागा लवकर ठरत नसतील तर आम्हाला तयारीला लागणार आहोत. निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ आला आहे. त्यामुळे आमच्यासमोर आघाडीत जाणे किंवा स्वतंत्र लढणे असे दोनच पर्याय आहेत.