लाेकमत न्यूज नेटवर्कबारामती (पुणे) : राजकीय पंढरी बारामतीत विविध पक्षांचे बारा खासदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी शनिवारी दाखल झाले आहेत. खासदारांचा हा दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दौऱ्याच्या अनुषंगाने राजकीय चर्चेला सध्या ऊत आला आहे.
सर्व खासदारांचे सकाळी बारामती विमानतळावर आगमन झाले. एकूण १९ खास लोकांचा हा दौरा आहे. यात १२ खासदार आणि काही उद्योगपतींचाही समावेश आहे. हे सर्व खासदार बारामती व परिसरातील विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पाहुण्यांनी प्रथम लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. नंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. येथील शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट दिली. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे माहिती देत होते.