पुणे : एका महिलेला घराबाहेर गेल्यावर आपला कोणीतरी पाठलाग करतंय, फोटो काढतंय, असा संशय येत होता. तिने महिला सहाय्य कक्षात याविषयी तक्रार केली. तरीही हा पाठलाग थांबला नाही. तेव्हा तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली. तिचे फोटो काढणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत त्यांची गुप्तहेर एजन्सी असून, त्यांच्या ग्राहकासाठी ते काम करत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी दोन्ही गुप्तहेरांना अटक केली आहे. नीलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २५, रा. वडगाव मावळ) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (वय ३०, रा. देहुगाव, ता. मावळ) अशी त्यांची नावे आहेत. नीलेश परदेशी यांची गुप्तहेर संस्था असून, बिरादार हे त्यांचे सहायक आहेत. हा प्रकार १ डिसेंबर २०२२पासून सुरू होता.
याबाबत कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी या जेथे जात, तेथे त्यांचा कोणीतरी पाठलाग करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून ते कोणाला तरी पाठवत असल्याचा संशय फिर्यादींना आला. काही दिवसांपूर्वी भरोसा सेल येथे तक्रार केली. परंतु, हा पाठलाग थांबला नसल्याचे त्यांना जाणवत होते. तेव्हा त्यांनी सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची भेट घेतली.
पोलिसांनी या महिलेवर कोण पाळत ठेवत आहे, याचा शोध घेणे सुरू केले. फिर्यादी तसेच त्यांचा कोण पाठलाग करतेय का? यावर साध्या वेशातील पोलिस नजर ठेवू लागले. फिर्यादी महिला या कोरेगाव पार्कमधील ऑर्थर्स थिम हॉटेलमध्ये ७ जानेवारी रोजी गेल्या होत्या. त्यावेळी दोघेजण लपून लांबून त्यांचे फोटो काढत होते. फिर्यादी यांच्यावर साध्या वेशात नजर ठेवून असलेल्या पोलिसांना त्यांची कृती संशयास्पद दिसल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते एका गुप्तचर संस्थेचे असल्याचे आढळून आले. त्यांना हे काम कोणी दिले, याची माहिती ते देत नसून सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर अधिक तपास करत आहेत.