पुणे : सदनिकेचा ताबा वेळेत दिला नाही म्हणून विविध कलमांसह ठेवीदारांचे हित संरक्षण कायदयाचे (एमपीआयडी) कलम बांधकाम व्यावसायिकावर लावण्यात आले. मात्र, एमपीआयडीचे कलम बांधकाम व्यावसायिकाला लागू होऊ शकत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. हा युक्तीवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकाविरूद्ध लावण्यात आलेले एमपीआयडीचे कलम रदद केले. विशेष न्यायाधीश एस.एस गोसावी यांनी हा आदेश दिला.
उत्तम नगर पोलीस स्टेशन येथे बांधकाम व्यावसायिक सचिन कुलकर्णी व नितीन कुलकर्णी यांच्याविरुद्ध विविध कलमांबरोबरच एमपीआयडीचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तक्रारदार यांनी सदनिकेचा ताबा वेळेवर दिला नाही म्हणून तक्रार नोंदविली आहे. मात्र, एम पी आयडीच्या संदर्भात तक्रारी मध्ये कुठेही उल्लेख नाही व कायद्याने एमपीआयडीचे कलम बांधकाम व्यावसायिका विरुद्ध या केस मध्ये लागू होत नाही असा युक्तीवाद आरोपीचे वकील हेमंत झंजाड यांनी केला. न्यायालयाने सरकारी वकील व पोलिसांची बाजू ऐकून घेतली आणि झंझाड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून एमपीआयडीचे कलम रद्द ठरवले. आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
--------------------------