पुणे: सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटी भरतीत महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात संगनमताने भ्रष्टाचार सुरूच असल्याची तक्रार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातूनच सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे कायदेशीर बंधन असताना पालिका प्रशासन त्याला हरताळ फासत असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.आघाडीचे अध्यक्ष उदय भट यांनी याबाबत माहिती दिली. कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात महापालिका आयुक्त व ठेकेदार यांच्यात करार होत असतो. त्यानुसार ठेकेदाराने प्रत्येक सुरक्षा रक्षकाला किमान वेतन कायद्यानुसार ९ हजार ५८४ रूपये मासिक वेतन द्यायला हवे. त्यात कर्मचाऱ्याचा बोनस, भविष्य निर्वाह निधी, ई. एस. आय. ची सर्व रक्कम समाविष्ट केली आहे. पालिकेकडून ठेकेदारांना याप्रमाणेच वेतनाचा धनादेश देण्यात येत असतो. असे असताना सन २०१५ पासून ठेकेदाराकडून सुरक्षा रक्षकांना फक्त ४ हजार ७५० रूपये देण्यात येत आहेत. याबाबत आवाज उठवल्यानंतर ४ महिन्यांपासून हे वेतन ६ हजार ५०० रूपये करण्यात आले.यातही सुरक्षा रक्षकाची आर्थिक लूटच होत आहे असे भट यांनी सांगितले. आघाडीच्या वतीने ४ मार्चला (शुक्रवारी) सकाळी १० पासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटी भरतीत भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 1:19 AM