पुणे : चार महिन्यांपूर्वी ज्या बँकेत सुरक्षारक्षक म्हणून तो काम करत होता, तीच बँक फोडून पैसे लुटण्याचा डाव त्याने रचला. कारण होते त्याला कामावरून काढून टाकल्याचे. बँकेची माहिती त्याला असल्याने आपला डाव यशस्वी होईल असे त्याला वाटले. त्यानुसार त्याने रात्री बँकेत प्रवेश देखील केला. मात्र, बँकेतील सुरक्षा रक्षक यंत्रणा आणि लष्कर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आता त्याला बेड्या पडल्या आहेत.
तपनदास बसंतादास (२९, रा.बक्स आसाम) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी, बँकेचे असिस्टंट मॅनेजर विजयकुमार विट्रीवेल (३०) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोलापूर बाजार रोड, कॅम्प येथे तामिळनाडू मर्कंटाईल बँकेत शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसंतादास हा पूर्वी याच बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्यामुळे त्याला बँकेच्या प्रवेशद्वाराची माहिती होती. बँकेच्या ठिकाणीच एक एटीएम सेंटर आहे. त्याच्या पाठीमागून एक दरवाजा थेट बँकेत जातो. बसंतादासने तेथून बँकेत आत प्रवेश केला. त्यानंतर लॅच लॉक तोडून शटरचे लोखंडी कुलूप तोडले. स्क्रु ड्रायव्हर, हेक्सॉ ब्लेडच्या साह्याने त्याने बँकेतील रोकड चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेत असलेल्या सुरक्षा विषयक यंत्रणेने याची माहिती बँकेच्या तमिळनाडू येथील मुख्य कार्यालयाला दिली. त्यांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अलर्ट दिला. त्यानंतर तत्काळ लष्कर पोलिसांच्या बीट मार्शलने बँकेकडे धाव घेतली. त्यावेळी बसंतादास हा बँकेत पोलिसांना आढळून आला. त्याला पकडून लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम. डी. कांबळे करत आहेत.