लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुंबई आणि ठाण्याप्रमाणेच पुण्यातील सुरक्षारक्षकांना वेतन आणि भत्तावाढ मिळावी, या मागणीकडे पुणे जिल्हा सुरक्षा मंडळ काहीही हालचाल करत नसल्याचा दावा महाराष्ट्र सुरक्षारक्षक आघाडीने केला असून आंदोलनाच्या तयारीसाठी गुरुवार दि.२९ रोजी पालिका भवनजवळील श्रमिक भवन येथे दुपारी ३ वाजता मेळावा आयोजित केला आहे.महाराष्ट्र सुरक्षारक्षक आघाडीचे संघटक अनंत मालप आणि किशोर काळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुमारे ३ हजार सुरक्षारक्षक सदस्य असून ३० हजार रक्षक बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा अंदाज आहे. राज्यात माथाडी कामगार कायदा १९८१ पासून अस्तित्वात आहे. २५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा सुरक्षा मंडळे स्थापन झालेली आहेत. शासनाच्या आदेशानुसार सुरक्षारक्षकांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये सुधारणा केली जाते.ठाणे आणि मुंबई जिल्ह्याने ३ जून रोजी आगामी ३ वर्षांसाठी ३१६० रुपये वेतन आणि भत्तावाढीचा प्रस्ताव प्रसिद्ध केला आहे. त्याबाबत हरकती आणि सूचना मागविल्या असून शासन मान्यतेनुसार ही वाढ लागू होईल. पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळानेही असा प्रस्ताव प्रसिद्ध केल्यास दरमहा १० ते १२ हजार रुपये मिळविणाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. त्याबाबत महाराष्ट्र सुरक्षारक्षक आघाडीने पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला लेखी पत्र देऊन वेतन आणि भत्ता वाढीचा प्रस्ताव प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत अद्याप काहीही हालचाल झालेली नाही, असे सांगण्यात आले.त्यामुळे सुरक्षारक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात असून २९ जून रोजी होणाऱ्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षारक्षक आघाडीचे अध्यक्ष उदय भट, सरचिटणीस दत्तात्रय अत्याळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षारक्षकांचा गुरुवारी मेळावा
By admin | Published: June 26, 2017 4:02 AM