पुणे : घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ७, १४ आणि १६ मधील मतदानासाठी २९१ मतदान केंद्रे सज्ज झाली असून, ती एकूण ७९ इमारतीत आहेत़ ज्या इमारतीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत, त्या ठिकाणी जादा सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे़घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांत एकूण २ लाख २० हजार ३९५ मतदार आहेत़ कृषी महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉलमध्ये सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून केंद्रप्रमुखांसह ३ मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस असा ६ जणांच्या टीमकडे मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य देऊन त्यांना ५५ गाड्यांमधून त्यांच्या मतदान केंद्रांकडे सकाळी साडेअकरा वाजता रवाना करण्यात आले़ या तीन प्रभागांतील प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदारांची ओळख पटवून घेण्यासाठी एक अधिकारी, नोंदवही व शाईचे मार्क करणारे अधिकारी, कंट्रोल युनिट सांभाळणारे अधिकारी अशी टीम असणार आहे़ संपूर्ण २९१ मतदान केंद्रांवर १ हजार ४५५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ एकूण १ हजार ७४६ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़ त्यापैकी ६० टक्के पुरुष असून ४० टक्के महिला अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे़याबाबत घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले, की या तीन प्रभागांतील काही मतदान केंद्रांना आपण भेटी दिल्या असून, काही ठिकाणी दुरुस्त्या करण्याची गरज होती़ त्याबाबत सूचना केल्या आहेत़ प्रभाग क्रमांक १६ मधील भीमनगर येथील मतदान केंद्र बदलण्यात आले आहे़ मंगळवार पेठेतील शिवाजी आखाडा मैदानात उघड्यावर तंबू टाकून मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे़ ज्या इमारतीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत, त्या ठिकाणी जादा सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे़ याशिवाय रांगा लावण्यासाठी बांबूने बंदिस्त करण्यास सांगण्यात आले आहे़ केंद्रप्रमुखाने मतदान केंद्र ताब्यात घेतल्यानंतर तेथे सर्वत्र मतदान कक्ष तयार केले.मतदान खोलीच्या बाहेर उमेदवारांची यादी लावणे, फळ्यावर मतदारांची संख्या लिहिणे, बाहेरील बाजूला फ्लेक्स लावणे, मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराची रेषा मारणे अशी कामे सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली होती़ प्रत्येक मतदान केंद्रावर महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांनी भेट घेऊन मंगळवारच्या मतदानासाठी ती सज्ज आहेत याची पाहणी केली़ (प्रतिनिधी)
जादा मतदान केंद्रांमुळे सुरक्षेत वाढ
By admin | Published: February 21, 2017 3:28 AM