--
राजगुरुनगर : खेड तालुक्यात खरीप हंगामात ४१ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावरील संभाव्य बी बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी दिली.
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बी बियाणे पुरवठा करणाऱ्या दुकांनावर गर्दी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी गावातच एकत्र येऊन एक गटप्रमुखाची निवड करुन मागणीनुसार खतांची मागणी, बी बियाणे आणि लागणारे गाडीभाडे असे मिळून पैसे जमा करुन गटप्रमुखामार्फत घरपोच बी बियाणे, खते घ्यावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच आपल्या गावासाठी असणाऱ्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार दिलिप मोहिते पाटील, खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, उपसभापती चागंदेव शिवेकर यांनी केले आहे.
खतांसाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. गावापातळीवर शेतकऱ्यांनी गट केला तर कृषी अधिकाऱ्यांच्या शिफारस पत्रानुसार गटप्रमुखाच्या आधारकार्डावर ५० खतांच्या गोणी घेता येणार आहे.
खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी कोरोना काळात घरी, गावात बसून होता. तर बागायती क्षेत्रात शेतकरी शेतात राबत होता. हवामान खात्याने यंदा वेळेत माॅॅन्सून दाखल होण्याचे संकेत दिल्याने खरीप हंगामात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आता वेग येण्यास सुरुवात होणार आहे. पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक आणि जादा दराने विक्री करण्याच्या तक्रारी येऊनही त्याची योग्य वेळेत दखल घेतली जात नसल्याने कोरोना कक्षाच्या धर्तीवर तालुकास्तरावर पंचायत समितीत खते, बी बियाणे तक्रार निवारण कक्ष सुरु करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे यांनी जिल्हास्तरीय ऑनलाईन खरीप हंगाम आढावा बैठकीच्या माध्यमातून केली आहे.
--
फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार
तालुक्यात बी बियाणे फसवणूक आणि खतांच्या जादा दराने होणाऱ्या विक्रीवर तालुकास्तरीय भरारी पथक नेमण्यात आले आहे. काही दुकानदार खताबरोबरच दुसरे खत घेण्याची सक्ती करणे, बी बियाणे फसवणूक होणे या समस्याबाबतीत शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी केल्यानंतर संबंधित पिशवी, टॅग आणि पक्के बील घेऊन जपून ठेवावे. दुकानदार जादा पैसे घेऊन कमी रकमेची बिले देणे, पक्के बिल मागितले शिल्लक असूनही न देणे, खते असताना खत संपल्याचे सांगणे आदी प्रकार आढळून आल्यास तत्काळ तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकारी अथवा आपल्या मंडलमधील कृषी मंडलाधिकारी कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार करावी.