देशी औषधी वनस्पतींच्या बियांची भेट; पुणे जिल्ह्यातील ५९८ कार्यालयात राबवणार
पुणे : देशी झाडं, औषधी वनस्पतींचे बीज गावागावत रूजावे यासाठी आता ‘सीड पोस्ट’ ही अभिनव योजना आजपासून (दि.२३) सुरू करण्यात आली. यात टपाल विभागाच्या योजनांच्या खातेदारांना हे सीड पोस्ट देण्यात येईल. त्यामुळे गावात चांगले बीज उपलब्ध होऊन ते रूजवता येईल आणि हरित पृथ्वीला हातभार लागेल.
जागतिक वन्यजीव दिन, वन दिन, जल दिन, हवामान दिनानिमित्त हा देशातील पहिला उपक्रम सुरू केला. वन विभाग, टपाल विभाग आणि बायोस्फिअर संस्थेतर्फे हा उपक्रम होत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज वनभवन येथे झाले. यावेळी पुणे विभागाच्या टपाल सेवेच्या संचालक सिमरन कौर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण), वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) रंगनाथ नाईकडे, बायोस्फिअर संस्थेचे संस्थापक सचिन पुणेकर, टपाल विभागाचे राजगणेश घुमरे आदी उपस्थित होते.
कौर म्हणाल्या, पृथ्वीचे आपण एक भाग असून तिला वाचविण्याचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सीड पोस्ट होय. यातून वृक्ष लागवडीला हातभार लागेल.
खांडेकर म्हणाले, आपली नाळ पर्यावरणाशी जोडलेली आहे. पण सध्या आपल्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येत आहे. वृक्ष तोडली जात आहेत. वृक्ष संवर्धनाचे काम वन विभाग आणि संरक्षण विभाग करताना दिसते. इतरांनी देखील यात सहभागी व्हायला हवे.
वानखेडे म्हणाले, टपाल विभागाच्या कार्यालयाच्या जागेतही वृक्षारोपण झाले तर तिथे खूप पक्षी येतील आणि तिथून ते झाडांवरील बी इतर ठिकाणी रूजवतील. म्हणून पुणे ग्रामीणमधील ५९८ टपाल कार्यालयात ही योजना असेल. माहिती, प्रसिद्धी (वने) विभागीय अधिकारी रामदास पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------
काय आहे सीड पोस्ट ?
पुणे ग्रामीणमधील ५९८ टपाल कार्यालयातील जे खातेदार आहेत, त्यांनी कार्यालयात भेट दिल्यावर ही सीड पोस्ट त्यांना दिले जाईल. त्यात विविध देशी, औषधी आणि रूजणा-या बिया असतील. सध्या ही योजना पुणे जिल्ह्यात राबवत आहोत, पण संपूर्ण देशात ही रूजली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सचिन पुणेकर यांनी सांगितले.
--------------------
फोटो : सीड पोस्ट योजनेचे उद्घाटन करताना विवेक खांडेकर, सिमरन कौर, रवींद्र वानखेडे, रंगनाथ नाईकडे, सचिन पुणेकर आदी.