पिंपरी : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना अमेरिकेतून आणलेल्या इंजेक्शनचा पहिला डोस दिल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी जगताप यांची भेट घेतली. त्यावेळी भाऊंनी हात जोडले. फडणवीस यांनी जगताप यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांची चर्चा केली. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी फडणवीस यांना सांगितले.
चिंचवडचे आमदार आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बाणेर येथील खासगी रूग्णालयात १२ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्यान १४ एप्रिलला त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आला होता. तसेच रात्री २ वाजता मुंबईतून निमोनियावरील इंजेक्शन दिले होते. याबाबतचे वृत्त सोशल मिडीयावर पसरताच उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआय अशा सर्वच नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जगताप यांची भेट घेतली. तसेच अश्विनी जगताप आणि भाऊ शंकर जगताप यांच्याशीही संवाद साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अमेरिकेतून येणाऱ्या इंजेक्शनला परवागी मिळवून देण्यासाठी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत केंद्र सरकारची परवानगी घेण्यासाठी जबाबदारी सोपविली. त्यानंतर या इंजेक्शनचा पहिला डोस चार दिवसांपूर्वी दिला आहे. त्यामुळे जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
दोन दिवसांपासून व्हेंटीलेटर काढण्यात आले आहे. शनिवारी आरपीआयचे नेते रामदास आठवले, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, नितीन सरदेसाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भेट घेतली. रविवारी सकाळी पावणेबाराला फडवणीस यांनी रुग्णालयात जगताप यांची भेट घेतली. त्यावेळी ‘भाऊ कसे आहात, असे म्हणताच जगताप यांनी हात जोडले. प्रतिसाद दिला. त्यानंतर फडणवीस यांनी डॉक्टरांशी संवाद साधला.
चार डोस देणार
अमेरिकेतून आलेल्या इंजेक्शनचे चार डोस देण्यात येणार आहे. त्यापैकी एक डोस चार दिवसांपूर्वी दिला आहे. एक, आठ आणि पंधरा दिवस अशा पद्धतीने डोस देण्यात येणार आहे.