पुणे : माणूस हा संपूर्ण सृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे या सृष्टीवर आपलाच अधिकार असल्याच्या माजातून माणसाने बाहेर यावे. पर्यावरणाच्या बाबतीत लिहिता- वाचता येणारेच अडाणी राहिले. शिक्षण पदवी देते; पण ज्ञान देते की नाही, हा खरा प्रश्न आहे. परंपरा विसरून स्वत:ला साक्षर म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा निरक्षर मंडळी जास्त शहाणी आहेत, असे मला वाटते. मुळा-मुठेच्या सान्निध्यात मी पूर्वी राहत होते. आज त्या नद्यांकडे बघून मन गलबलून येते, अशी खंत लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात भवाळकर बोलत होत्या. प्राचार्य दिलीप शेठ, उपप्राचार्य हनुमंत ठोंबरे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहप्रकाश पायगुडे, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले.‘काळाच्या ओघात आपण गतिमानतेकडून गणितमानतेकडे जायला लागलो. जगणे ज्यांना कळले, त्यांना आम्ही अडाणी म्हणणार का? निरक्षर लोक अधिक शहाणे आहेत. लोकजीवनाशी नाळ तोडल्यानेच आपण अवनतीच्या अवस्थेला आलो. पर्यावरणापेक्षाही प्रकृती हा शब्द योग्य वाटतो. प्रकृतीनेच माणसाला शहाणपण दिले आहे. नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करणाºया आम्ही आता त्याला प्लास्टिकमय करून टाकले आहे.
उत्सवांच्या परंपरा विसरून आपण त्याला शहाणपणाचे मुलामे चढवले आहेत. जे पाणी आपल्याला निसर्ग देतो, ते पाणी शुद्ध करण्याची निसर्गाची स्वत:ची एक क्षमता असते; पण या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आपण पाणी प्रदूषित करतो आणि तिथूनच सगळे प्रश्न सुरू होतात.विद्यार्थ्यांनी माहितीच्या महाजालाचा वापर करताना ज्ञानी होणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचा कल केवळ माहिती मिळविण्याकडे असल्याचे दिसून येते. पर्यावरणाविषयी केवळ आत्मीयता न बाळगता प्रत्यक्ष जीवनात आपण तसे बदल केले पाहिजे.- दिलीप शेठ, प्राचार्य