जयवंत गंधाले
हडपसर : रोज माल आणायचा... आणि रोज विकायचा.... त्यातून चार पैसे मिळायचे, दुसऱ्या दिवशी परत माल आणायचा आणि परत विकायचा.... आता आणलेल्या मालाचे नुकसान झाले. तो विकला असता तर भांडवल मिळाले असते. मात्र, आता भांडवल पण गेले. धंदा कसा करायचा... असा आकांत शहाजा शेख यांच्या हुंदक्यातून व्यक्त होत होता आणि त्यांच्यासमोर पडलेल्या त्यांच्या गाळ्यातील भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून उपस्थितांचे मन कालवले होते.
काल सकाळपासून महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले. आश्वासन देऊन गेले. मदत मिळेल तेव्हा मिळेल पण आत्ता काय खायचं असा सवाल भाजी मंडईमध्ये आगीत स्टॉल भस्मसात झालेल्या व्यावसायिकांनी केला आहे.
सोमवारी मध्यरात्री हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे असणाऱ्या भाजी मंडईमध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये ९० स्टॉल भस्मसात झाले. या स्टॉलवर असलेल्या भाज्या करपून गेल्या. बटाटे शिजून गेले. लसूण जळून गेला. काल विकून शिल्लक राहिलेला माल रात्रीत जळून खाक झाला. काही व्यावसायिकांना आपला स्टॉल भस्मसात झाल्याचे कळले, तर काहींना रात्रीच डोळ्यासमोर आपला माल जळताना पाहायला लागला. काल दिवसभर लोक आली, फोटो काढले. मदत करतो म्हणाले, आता किती लोक मदत करतील. याकडे आमचे लक्ष लागल्याचे महिला व्यावसायिकांनी सांगितले. काल दिवसभर आपल्या स्टॉलमधून जळलेला माल बाजूला करून विकण्यासाठी काही माल राहतोय का, निघतोय का. तो निवडण्यात काही विक्रेते दिसत होते.
गेले तीन महिन्यापासून येथे वॉचमन व सीसीटीव्ही बसवण्यासाठी विक्रेते महापालिकेकडे पाठपुरावा करत होते. मात्र, येथे सुविधा नसल्याने येथे शॉर्टसर्किट झाले की कोणी आग लावली, अशी याबाबत शंकाही व्यावसायिकांनी उपस्थित केली आहे. वॉचमन असता तर हा प्रकार घडला नसता, असेही व्यावसायिकांनी सांगितले.