पुणे - राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १५ लाख भाविकांच्या, वारकऱ्यांच्या मेळ्याने आज पंढरी नगरी दुमदुमली आहे. भीमेच्या तिरावर जमलेला वैष्णवांचा मेळा पाहून सर्वचजण भक्तीत तल्लीन झाला आहे. आपल्या लाडक्या विठु-माऊलीचं रूप पाहून भक्त भरुन पावले असून आषाढीचा हा क्षण लाखो भाविकांसाठी दिवाळी-दसराच असतो. मैल न मैल चाललेली पाऊले आज पंढरीत विसावली आहे. पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य झाल्याचं समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असतं. दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरही हेच समाधान यंदा दिसलं. मुलाने त्यांची इच्छा पूर्ण केल्याचं स्वत: प्रवीण तरडेंनी फेसबुकवरुन सांगितलं.
प्रवीण तरडे यांचे आई-वडिल वारकरी असून गेल्या ५० वर्षांपासून ते दरवर्षी पंढरीची वारी करतात. मात्र, पांडुरंगाच्या जवळ जाऊन त्याचं साजरं रुप पाहण्याचा योग त्यांना कधी लाभला नाही. त्यामुळेच, यंदा त्यांनी आपल्या लेकाकडे जगात कुठेही न फिरायला जाता, पंढरीला घेऊन चल असं मागणं घातलं. मुलानेही त्यांची ही इच्छा पूर्ण केली अन् फेसबुकवरुन अनुभव शेअर केला. त्यामध्ये, विठ्ठलाचे रूप पाहून, पांडुरंगाला जवळून पाहताच आई-वडिल पाहतच राहिले, त्यांना रडूही कोसळले, असे तरडेनं पोस्टमध्ये म्हटलंय.
प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट
काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय.. ? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो , म्हणाल त्या देशात.. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल .. मी म्हणालो पंढरपूर ..? का ..? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं , धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा.. जरा निरखून पहायचाय..
मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला.. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं .. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्ष का टिकून आहे .. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं..