कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अत्यावश्यक व्यवसाय वगळता इतर व्यवसायांना बंदी घातली आहे. मागील वर्षभरापासून छोट्या व्यावसायिकांनी आपल्या जमा पुंजीवर आपले घर चालवायचा प्रयत्न केला आहे. अनेक व्यावसायिकांना उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही. कित्येक व्यावसायिकांना आता उत्पन्न येणार कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता संपूर्ण वर्ष झाले तरी अजून त्यांचे व्यवसाय चालू न झाल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दुसरा मार्ग नसल्यामुळे आता कुटुंबाचे पोट कसे भरायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली व्यवसायिक इतर जनरल वस्तूही विकू लागल्यामुळे आता या छोट्या व्यावसायिकाकडे कोण जाणार अशी परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. शासनाने मुंबईसारख्या ठिकाणी फेरीवाल्यांचा विचार केला. मात्र ग्रामीण भागात असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा विचार का केला नाही, असा सवाल छोट्या व्यावसायिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा, मेडिकल इत्यादी व्यवसायांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. छोटा व्यावसायिक आपल्या छोट्याशा दुकानात आपला व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे गर्दीचा प्रश्नच येत नाही, असेही व्यावसायिक म्हणत आहे. उलट अत्यावश्यक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहेत. शासनाने छोट्या व्यावसायिकांची गरज लक्षात घेता त्यांना ठराविक वेळेत व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांकडून होत आहे.