लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इंजिनिअरिंगचे २ वर्ष पूर्ण केल्यानंतर अर्धवट शिक्षण सोडले. लहान मुलांचे क्लास घेत असतानाच अमली पदार्थाच्या विक्रीमध्ये ते शिरले अन् आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसात छापा टाकून तिघांकडून गांजा, चरस, हशिश तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
नासीर नुरअहमंद शेख (वय ३०, रा. अमित अस्ट्रोनिया क्लासिक सोसायटी, उंड्री, मूळ गोवा), पुनित सतबीर कादयान (वय ३५, रा. व्यंकटेशभूमी ब्लीस सोसायटी, उंड्री मूळ हरियाणा) आणि शरत विजयन नायर (वय ३४, मूळ चेन्नई) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
नासीर शेख याच्याकडून १ किलो ६०० ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम १०० मिलिग्रॉम हशिश तेल, इलेक्ट्रानिक वजन काटा जप्त केला आहे. पुनित आणि शरत यांच्या घरातून ३ किलो ५०० ग्रॅम गांजा, ८ ग्रॅम ३३० मिलिग्रॉम चरस, इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त केला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना नासिर शेख याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून शेख याला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर इतर दोघांची माहिती मिळाली. नासीर शेख हा लहान मुलाचे क्लास घेतो. तो पुनित याच्याकडून अमली पदार्थ घेत असतो. शरत हा काही महिन्यांपूर्वीपासून पुनित याच्याबरोबर रहात आहे. दोघेही पूर्वी कंपनीत काम करायचे.
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितीन जाधव, योगेश मोहिते यांनी ही कामगिरी केली.