पिंपरी: खेड तालुक्यातील काळुस गावाच्या हद्दीत भाम नदीच्या पात्रालगत दाट झुडपातील गावठी दारूच्या हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा मारून रविवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत ९७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यावेळी पती - पत्नी दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उत्तरसिंग रामकुमार राठोड (वय ४५) आणि मंजिला उत्तरसिंग राठोड (वय ३०, दोन्ही रा. काळूस भोसे, ता. खेड), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे पती-पत्नी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळुस गावाच्या हद्दीत नदीच्या पात्रालगत दाट झुडपात गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपी तेथे दारू तयार करत होते. पोलिसांना पाहून आरोपी उत्तरसिंग राठोड हा टेकडीवरून उडी मारून नदीच्या पाण्यातून पळून गेला. आरोपी मंजीला हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता दारूची हातभट्टी त्यांचीच असल्याचे तिने कबूल केले. हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचे १८०० लिटर कच्चे रसायन, बॅरल, थाळी, कॅन, असे साहित्य मिळून आले. दारूचे रसायन जागीच नष्ट करून इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.