- प्रमोद जाधव (उपायुक्त, समाजकल्याण)
शेतीमध्ये बियाणे ही मूलभूत बाब असून, तो शेतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात पिकामध्ये वाणांची विविधता आढळते. सध्या वातावरणातील बदल, पोषण व अन्नसुरक्षा, चांगले जीवनमान या आव्हानांसाठी स्थानिक पिकांतील जैववैविधता संवर्धन ही काळाची गरज आहे. बायफ, पुणे या संस्थेने लोकसहभागातून स्थानिक पीक जातीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्वापर कार्यक्रम सुरू केला. त्यांनी स्थानिक भाताचे सुमारे ३५० प्रकार तसेच नाचणी, ज्वारी व मका आदींचे २०० वाण संकलित केले आहेत. या वाणाची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली. त्यातील चांगले बियाणे निवडून अधिक उत्पादन देणारे शुद्ध वाण विकसित केले आहेत. शेतकरी गट व बियाणे बँकाची निर्मिती असे उपक्रम सुरू आहेत.
काही जुन्या भात व अन्य बियाणांची चव अतिशय उत्तम आहे. तसेच काही पौष्टिक आहेत. या नैसिर्गक परिस्थितीत दीर्घकाळ टिकून असल्याने बहुतांश वाण काटक आहेत. हे वाण कमी-जास्त पाऊस व अन्य प्रतिकूल परिस्थितीतही तग धरतात. या वाणामध्ये प्रतिकारक क्षमता चांगली असल्याने रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. यातील बहुतांश भात जातीचे टरफल जाड असल्याने व अन्य कारणाने दाण्याचे किडीपासून कमी नुकसान होते.
स्थानिक जातींमध्ये जैववैविध्य मोठ्या प्रमाणात आढळते. डोंगराळ भाग, सखल भाग, खाडी किनाऱ्याचा भाग अशा विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये येणारे वाण आहेत. तसेच हळवा, निमगरवा, गरवा अशा विविध कालावधीत येणारे वाण आहेत. कोथिंबीर साळ तांदळाला सुगंध आहे. बदलत्या हवामानाच्या काळात बियाणांचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पीक जातीच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे बियाणांमध्ये स्वयंपूर्णता येईल.