महामंडळ अध्यक्षांचा हेकेखोरपणा : केवळ एकाच स्थळाची होणार पाहणी
अध्यक्षांची भूमिका : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ असा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ असा सूर आळवत महामंडळ अध्यक्षांनी सुरुवातीपासूनच दिल्लीत संमेलन घेण्यास विरोध केला. त्यामुळे नाशिकलाच संमेलन घ्यायचे, अशा हट्टाला पेटत लोकहितवादी मंडळाकडून ऐन वेळी निमंत्रण मागवून घेतल्याचेही बोलले जात आहे. आगामी संमेलन नाशिकलाच घ्यायचे आणि ते शक्य नसल्यास संमेलनच रद्द करायचे, अशी भूमिकाही अध्यक्षांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी औरंगाबाद येथील कार्यालयात पार पडली. बैठकीत संमेलनस्थळ निवड समिती सदस्यांची निवड केली. ही समिती नाशिक येथे स्थळ निवडीसाठी ७ जानेवारी रोजी भेट देणार आहे. केवळ तीन ठिकाणची निमंत्रणे आलेली असताना स्थळ समितीकडून केवळ नाशिकचीच पाहणी केली जाणार आहे. संमेलनस्थळ आधीच ठरलेले असताना स्थळ निवड समितीचे सोपस्कार तरी कशासाठी, असा प्रश्न साहित्य वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ८ जानेवारी रोजी स्थळ निवड समितीची बैठक औरंगाबाद येथे होणार आहे. ३ जानेवारी रोजी झालेल्या बैैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई साहित्य संघानेही दिल्लीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. इतर पदाधिकाऱ्यांचे मत विचारात न घेता महामंडळ अध्यक्षांची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने महामंडळ अध्यक्षांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
---
टकले, भुजबळ यांनी दिल्लीला पाठिंबा द्यावा : संजय नहार
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत एकदाही संमेलन झालेले नाही. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे दिल्लीत संमेलन घेण्याच्या निर्णयास महामंडळ अध्यक्षांसह हेमंत टकले, छगन भुजबळ यांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी केले आहे. ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या ओळींप्रमाणे मराठी भाषेच्या अभिजात दर्जापासून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, याकडेही नहार यांनी लक्ष वेधले.