वालचंदनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आणि महिलांनी स्वत:ला चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर काढावे. तसेच, नवनवीन आव्हानाला सामोरे जात यश प्राप्ती करणे काळाची गरज आहे, असे आवाहन वर्षा कुंभार यांनी केले.
वालचंदनगर येथील सन्मती महिला मंडळाने आयोजित पारंपरिक वेषभूषा स्पर्धेत मुली आणि महिलांच्या तीन गटांत ५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने या स्पर्धा सन्मती मंडळाच्या सभागृहात घेण्यात आल्या होत्या.
या वेळी बोलताना डॉ. रीता दगडे म्हणाल्या की, कोरोनाच्या काळातील संसर्ग अद्यापही संपलेला नाही. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबर कुटुंबाची काळजी घ्यावी. सरकारकडून उपलब्ध होइल त्यानुसार लसीकरण करावे.
हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रात महिलांंकडून संस्कृती आणि संस्कार जोपासना केली जाते, असे विशेष गुणवत्ताप्राप्त शिक्षिका वर्षा कुंभार यांनी सांगितले. या वेळी निकिता दोभाडा, पद्मरेखा अचलारे, मंजूषा दोभाडा, सारिका गांधी यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व सभासदांनी हळदीकुंकू व पारंपरिक वेषभूषा स्पर्धा नियोजन केले.अरुंधती बर्गे व वर्षा कुंभार यांनी परीक्षक म्हणून काम केले. लहान गटात श्रीया कंदले, परी दोशी, पूर्वा दोभाडा, मोक्षा उपाध्ये, मध्यम गटात सौम्या कंदले, जुईली हिप्परकर, स्वरा अचलारे आणि मोठ्या गटात प्रिती दोशी यांनी प्रथम, तेजश्री शहा यांनी द्वितीय आणि प्रतीक्षा मिसाळ तृतीय क्रमांक मिळवला. या वेळी निकिता दोभाडा यांनी सूत्रसंचालन केले.