पुणे : केवळ रस्ता सुरक्षा अभियान किंवा शासनाकडून विविध उपाययोजना करूनही रस्त्यावरील अपघात कमी होणार नाहीत. त्यासाठी वाहनचालकांनाही स्वयंशिस्त लावून घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वयंशिस्तीतूनच अपघातमुक्तीकडे जाता येईल, असे आवाहन रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी करण्यात आले.जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी समारोप झाला. त्यानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे व अमर साबळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पालिका आयुक्त सौरभ राव, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत व्यासपीठावर उपस्थित होते. वाहतूक विषयक जनजागृती, वाहतूक नियमन, पोलिसांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या विविध संस्था व नागरिकांचा या वेळी सन्मान करण्यात आला; तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल काही पोलीस कर्मचाºयांना गौरविण्यात आले.शिरोळे म्हणाले, ‘वाहतूक प्रश्नाबाबत प्रत्येकाने संवेदनशील व्हायला हवे. स्वयंशिस्त पाळून एकजुटीने काम केल्यास अपघात नक्कीच कमी होतील. त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायला हवी.’ साबळे यांनी अपघात कमी होण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाहनचालकांनी शिस्त पाळल्यास अपघातमुक्ती होऊ शकते. त्यासाठी वाहतुकीचा बृहत आराखडा तयार करावा. खासदार निधीतून पैसे उपलब्ध करून देऊ, असे साबळे यांनी सांगितले.शहरात दररोज शेकडो वाहनांची नोंदणी होतेय. सध्या उपलब्ध जागेचा विचार करायला हवा. वाढणाºया वाहनांना शिस्त कशी व कोण लावणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन शुक्ला यांनी केले. रस्ता सुरक्षा सप्ताहापुरता मर्यादीत न राहता त्याची चळवळ उभी राहायला हवी. हॉर्नचा वापर कमी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, जनजागृतीचे १ लाख बँड तयार करण्यात आल्याचे आजरी यांनी सांगितले.पोलिसांना कुल जॅकेट व टोपीउन्हामध्ये रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमन करणाºया पोलीस कर्मचाºयांना कूलिंग जॅकेट व टोपी दिली जाणार आहे. सोमवारी कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाºयांना त्याचे वाटप करण्यात आले. हे जॅकेट व टोपी घातल्यानंतर, बाहेरील तापमानापेक्षा शरीराला ६ ते ८ अंश सेल्सिअसने उन्हाच्या झळा कमी बसतात. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून ही जॅकेट देण्यात आली असून, सौरभ राव यांनी आणखी ५०० जॅकेट देण्याची घोषणा या वेळी केली.वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणाआॅटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर काम सुरू आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच, वाहने कमी करण्यासाठी पीएमपीला सक्षम करणे आवश्यक असून, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.
स्वयंशिस्तीतूनच होईल अपघातमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:56 AM