टाकळी हाजी : सेल्फीच्या नादात टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यावर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली.विलास शंकर उपाध्ये (वय ४४, रा. कोऱ्हाळे, ता. राहता, जि. अहमदनगर) हे निघोज येथे एका नातेवाइकाकडे एका कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम संपवून उपाध्ये हे आपल्या अन्य दोन मित्रांसमवेत निघोज येथून कुंड पर्यटनस्थळावर गेले. तेथील निसर्गरम्य पर्यटन व वाहणाऱ्या धबधब्यांजवळ सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. फोटो काढतानाच पाय घसरून पडल्यामुळे उपाध्ये वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात फेकले गेले. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी एका दगडाला धरून ते सुमारे १० मिनिटे जिवाच्या आकांताने प्रयत्न करीत होते, असे एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितले. (वार्ताहर)1 स्थानिक ग्रामस्थांनी या वेळी दोरी उपलब्ध न झाल्याने शेजारी वाळत असलेली गोधडी त्याच्या दिशेने फेकली. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने ती त्याच्या डोक्यावरून गेली; पण त्याच्या हात पोहोचू शकला नाही. 2याच वेळी त्यांनी दगडाला धरलेला हात निसटला आणि ते प्रवाहात खोल दरीत गेले. त्यांचा अद्याप तपास लागू शकला नाही. या घटनेची माहिती समजताच पारनेरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप शोध सुरूच असून, पारनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सेल्फीच्या नादात पर्यटकाचा गेला जीव
By admin | Published: September 30, 2016 4:46 AM