कामशेत : शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवार, दि. ९ पासून वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत स्वत:च्या मोबाइलमध्ये सेल्फी काढून ती अन्ड्रॉइड अॅप उपस्थितीद्वारे अपलोड करून सरकारला सादर करावयाची आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना त्रास होत असून, मावळातील बऱ्याच शिक्षकांमध्ये या विषयी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. मावळ तालुक्यातील बऱ्याच शिक्षकांकडे मल्टिमीडिया मोबाइल नसून, अनेकांना तो वापरण्याचे ज्ञानही नसल्याचे समोर येत आहे. त्यांना तो खरेदी करण्याची व वापर करणे शिकण्याची वेळ आली आहे. तसेच दर सोमवारी शासनाला वर्गातील दहा विद्यार्थ्यांचे गट करून सेल्फी व पटसंख्या संदर्भातील इतर माहितीसाठी दोन तास लागणार असल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, हा मोठा प्रश्न समोर येत आहे. या व्यतिरिक्त तालुका कृषिप्रधान, ग्रामीण असल्याने येथे अनेक अडचणी नेहमीच असतात. यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, न पोहोचलेले नेटवर्क या महत्त्वाच्या समस्यांव्यतिरिक्त इतर अनेक समस्या असताना शासनाच्या या निर्णयाचे अनेक शिक्षक अप्रत्यक्ष विरोध करीत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त शिक्षकांना अनेक इतर कामे शासन कायमच देत असून, त्यात नवीन सेल्फीचे प्रकरण समोर आल्याने सर्वसामान्य शिक्षक धास्तावला आहे. दप्तराच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचा व शासनाच्या विविध कामांच्याखाली शिक्षकांचा जीव गुदमरू लागला असल्याचे अनेक तज्ज्ञ शिक्षक सांगत आहेत. सरासरी शाळेची संपूर्ण पटसंख्या पाहिली तर कामशेत शहरातील पंडित नेहरू विद्यालयाची सरासरी पटसंख्या २२०० असून १० विद्यार्थ्यांच्या गटाचा एक सेल्फी याप्रमाणे २२० सेल्फी काढावे लागणार आहेत. शिवाय ते मोबाइलची जीपीएस सिस्टीम सुरु करून काढावयाचे असल्याने अँड्रॉइड उपस्थिती या अॅपद्वारे शासनाला पाठवायचे आहेत. (वार्ताहर)
सेल्फीच्या सक्तीने होतेय तारांबळ
By admin | Published: January 11, 2017 2:52 AM